सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत
ज्याला आपण कलाकार म्हणतो त्या माणसात "नक्कल" (imitation) अथवा सृजनशीलता(creativity) ह्यापैकी एक गुण नक्कीच असतो. नक्कल करणाऱ्याकडे "स्मरणशक्ती" असावी लागते. तर सृजनशील कलावंताकडे रचना शास्त्राचे ज्ञान असावे लागते.
नक्कल करणाऱ्याकडे जर "स्वरज्ञान" व "तालज्ञान" हे गुण अंगीभूत असतील तर तो सुगम संगीत,सिनेसंगीत चांगले गाऊ शकतो. एक गाणे १० ते १५ वेळा ऐकले की ते गाणे हा मनुष्य जसेच्या तसे गाऊ शकतो. अगदी ताना आलापांसह. याचा प्रत्यय आपल्याला "रिॲलिटी शो" मध्ये लहान मुलांचे गायन ऐकताना येतो. त्यातून "दुधात साखर" म्हणून, जर आवाजाची दैवी देणगी असली तर तो गायक श्रोत्याला भरपूर आनंद देऊ शकतो. लोक त्याला डोक्यावर घेतात. पुढे तो पैसा व प्रसिद्धीही भरपूर मिळवतो. परंतु या पूर्ण प्रवासात त्याला संगीताचे "ज्ञान" होते का ? तर उत्तर येईल "नाही". मनाने चित्र काढणे आणि एखादे चित्र पाहून ते तसे हुबेहूब काढणे यात फरक आहे.मनाने चित्र काढणे यामागे तपश्चर्येचा भाग येतो. प्रत्येक प्रतिमा जाणून घेऊन ती स्मरणात ठेऊन त्या प्रमाणात कागदावर उतरविणे याला अभ्यास व व्यासंग लागतो. सुगम संगीत गाण्यासाठी शास्त्रिय संगीत शिकायला हवे असे नाही.
सुगम संगीत ही "अविस्तारक्षम" रचना असते तर शास्त्रीय संगीतातील "राग" ही "विस्तारक्षम" रचना असते. एखाद्या स्वरसमुहाचा विस्तार करून त्यातून एक आनंददायी, सुस्वरूप स्वराकृती कशी तयार करावी हे गायकाला कळावे लागते. त्यासाठी त्याच्याकडे कल्पकता,सौंदर्यदृष्टी,रचनाशास्त्र हे घटक/गुण असावे लागतात. ते सुगम संगीत गायकाकडे असले पाहिजेतच असे नाही. कारण ते सर्व काही संगीतकाराने बघितलेले असते. गीताची चाल तयार असते, ते कसे म्हणायचे ते संगीतकार शिकवतो. त्यामुळे ते सादर करण्याची जबाबदारी फक्त गायका कडे असते. त्याला स्वतःची बुद्धी वापरायची नसते.
मुळात शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत हे दोन भिन्न प्रांत आहेत. सुगम संगीत विस्तारित करायचे नसते. ते आहे तसे गायचे असते व तेच लोकांना आवडते.
नेहमी एक प्रश्न विचारला जातो की सुगम संगीत येण्यासाठी शास्त्रीय संगीत शिकावे का ? मी तर म्हणेन "नाही". ज्याला चांगले स्वरताल ज्ञान आहे व जो चांगली नक्कल करू शकतो त्याला नुसते ऐकूनही सुगम संगीत गाता येऊ शकते.
मात्र गायकाला गीतातील अर्थ व भावना कळणे अत्यंत आवश्यक असते. त्याला काव्याचा थोडाफार व्यासंग असावा लागतो. नक्कल ही जिवंत असावी. अर्थ लक्षात न घेता,त्यात आवाजाच्या माध्यमातून भावना न ओतता जर नुसती चाल उत्कृष्ट गायली तर ते गाणे रंगहीन व प्राण गमावलेले असे होईल.
झाडावर तयार झालेले फुल तोडून देवाला अर्पण करणे म्हणजे "सुगम संगीत". आणि झाडावर फुल निर्माण करणे म्हणजे शास्त्रीय संगीत.
सुगम संगीत/सिने संगीत गाऊन कलाकार लोकांचे मनोरंजन करतात , त्यांना प्रसिद्धी मिळते,परदेश दौरे ही होतात.
कलाकार लौकिक अर्थाने यशस्वी होतो. जगातील सर्व सूखे तो मिळवतो.
पण त्यातून आपल्या हाती नवे असे ज्ञान गवसत नाही. त्याच्या आयुष्यातील वेळ सुखा समाधानात जातो. क्षणापुरते सुख मिळते. लोकांच्या स्तुतितून आपला अहंकार पोसला जातो. आपण स्वतःला "Great" समजू लागतो. खऱ्या ज्ञानाकडे पावले वळतच नाहीत.
वाद्यवृंदात गाणाऱ्या बऱ्याच गायकांचे असेच होते. काही वर्षांनी त्यांना जाणीव होते "अरे, आपण जन्मभर नक्कलच करीत राहिलो. स्वतःचे गाणे कधीच गायले नाही. शास्त्र समजावून घेतले नाही. स्वरसरोवरात कधीच आकंठ स्नान केले नाही." मग ते पश्चात्ताप करीत बसतात. वाद्यवृंदातील तबलजींचेही असेच होते. त्यांची हयात दादरा, केरवा आणि रूपक हे ताल वाजविण्यात जाते.
अर्थात जगात प्रत्येकाला गाण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला गावेसे वाटते. पण कुणाला सुराचे तर कुणाला तालाचे ज्ञान कमी असते. मग काय बरे करावे ? अशा लोकांनी मात्र सुगम संगीत सुद्धा शिकायला हरकत नाही. स्वरज्ञान होण्यासाठी बारा सुरांचे नाद समजून घ्यावेत. आरोह काय अवरोह काय, आवाज कसा वळवावा, शब्दोच्चार कसे करावेत,आवजात चढउतार कसा करावा, हे त्यातील तज्ञ माणसाकडून शिकून घ्यावे. त्याचा नियमित रियाझ करावा. आपल्या स्वतःच्या आनंदासाठी गात रहावे.गाण्यातला जितका मिळेल तेव्हडा आनंद घेत रहावा व आयुष्य समृद्ध करावे.
✍️श्री.किरण फाटक सर (डोंबिवली)